सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात रेल्वे सुरक्षा बलाने मोठी कामगिरी बजावत मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये दरोडा टाकण्याचा कट उधळून लावला आहे. या प्रकरणी आरपीएफने नऊ संशयित महिलांना अटक केली असून, त्यांच्याकडून अधिक तपास केला जात आहे. या कारवाईमुळे रेल्वे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या सीपीडीएस पथकाने संशयास्पद हालचाली करणार्या महिलांच्या एका टोळीवर लक्ष केंद्रित केले होते. सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये दरोडा टाकण्याच्या उद्देशाने या महिला दबा धरून बसल्या होत्या. मात्र, पथकाने वेळीच झडप घालून या नऊही महिलांना ताब्यात घेतले.
धाराशिव कनेक्शन आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी
अटक करण्यात आलेल्या सर्व महिला आरोपी या धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यातील काही महिलांवर यापूर्वी देखील रेल्वेमध्ये चोरी आणि लूटमारीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. ही टोळी केवळ सोलापूरच नव्हे, तर पुणे विभागातही सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू
आरपीएफने या महिलांना प्राथमिक चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी लोहमार्ग पोलीस (), कुर्डूवाडी यांच्या ताब्यात दिले आहे. ही टोळी रेल्वेमध्ये कशा प्रकारे चोरी करायची आणि त्यांच्या मागे आणखी कोणाचे हात आहेत का, याचा तपास आता लोहमार्ग पोलीस करत आहेत. प्रवासादरम्यान प्रवाशांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी आणि संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तातडीने रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.